लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. सामाजिक न्याय विभागाने आधीच फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वितरित करण्यासाठी २२७ कोटी रुपये महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता दिली. त्यानंतर आता लाडकींच्या खात्यावर १५०० रुपये जमा होण्यास आजपासून सुरूवात झाली.
मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती दिली. त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले की , ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.’
आदिती तटकरे यांनी पुढे सांगितले की, ‘महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची महत्वाकाक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना चालवली जाते. दरमहिन्याला महिलांच्या खात्यात निधी जमाम केला जातो. जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे २३ फेब्रुवारीला देण्यात आला होता. त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष फेब्रुवारीचा हफ्ता कधी येणार याकडे लागले होते. अखेर आजपासून या हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
