मुंबई : लग्नाचा बनाव रचून, हनिमूनच्याच रात्री नवरदेवाच्या घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि दागिने घेवून फरार होणाऱ्या चोरटी नवरी आणि तिचा तथाकथित बापाला काशिमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या बाप-लेकीच्या जोडीने आतापर्यंत पाच जणांना फसवल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. तसेच, याप्रकरणात आणखीनही कारनामे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
आरोपी नेहा अरुण जाधव ( वय २२ ) ही मुळची अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच तिच्या तथाकथित बापाचे नाव केसरीमल लक्ष्मीलाल रांका (वय ४१) असून तो नाशिक येथील राहणारा आहे. काशिमीरा पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
या बाप बेटीच्या जोडीनं अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई आणि जळगाव येथील पाचोरा येथे अशाच प्रकारे गुन्हा केल्याचं समोर आलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्न करुन झाल्यावर हनिमुनच्या दिवशीच चोरटी नवरी घरातील मौल्यवान वस्तू, सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम घेवून फरार होतं होती. संगमनेर तालुक्यातील साकूर येथील एका तरूणाची देखील अशीच फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरूणाच्या लग्नाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पाच जणांना तरूणीनं लग्न करुन फसवल
मिरा भाईंदरच्या काशिमीरा येथे राहणारे 53 वर्षांचे सेवलकुमार नाडर हे व्यवसायाने इस्टेट एंजंट होते, त्यांना लग्न करायच होतं. तेवढ्यात आरोपीचा तथाकथित बाप केसरीमल रांका याने नाडार यांच्याशी संपर्क साधला. लग्न लावून देण्याकरीता त्याच्याकडून 44 हजार रुपये देखील घेतले आणि त्यानंतर त्याने आरोपी नेहा अरुण खेडेलवाल उर्फ जन्नत या 22 वर्षीय तरुणीशी लग्न लावून दिलं. मात्र, लग्न लागल्यानंतर दोन दिवसांनी बाप आणि मुलगी फरार झाली. नाडार यांच्या घरातील मौल्यवान वस्तू, सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 5 लाखांचा ऐवज घेऊन ती नववधु तरुणी पसार झाली. त्यामुळे, आपली फसवणूक झाल्याचं कळल्यावर नाडर यांनी थेट काशिमीरा पोलीस ठाणं गाठलं आणि चोरट्या नवरीची तक्रार केली. काशिमीरा पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केल्यावर त्यांच्याही भुवया उंचावल्या. कारण, या तरुणीने आत्तापर्यंत एक दोन नव्हे तब्बल पाच जणांना असं लग्न करुन फसवल्याच समोर आलं.
लग्नसोहळा आटपून, हनिमुनच्या दिवशीच घरातील दागिने घेऊन होयची फरार
सध्या मुलांचे लग्न जमत नसल्याने, किंवा मुलाचे वय वाढत असल्याने केवळ नात्यागोत्यातल्याच मुलीशी लग्न करावे, अशी संकल्पना मोडीत निघाल्याने, याचा गैरफायदा घेत लग्नाच्या नावाने फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच बाप मुलीची ही टोळी लग्नाचं वय निघून गेलेल्या, उशीरापर्यंत लग्न न झालेले किंवा ज्यांच्या पत्नी मृत पावल्या असतील, असे नवरदेव शोधायचे आणि लहान लग्नसोहळा आटपून, हनिमुनच्या दिवशीच घरातील मौल्यवान वस्तू, सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन मुलगी फरार व्हायची. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या टोळीमार्फत आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
