अहिल्यानगर – २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी दि. २३ एप्रिल रोजी मतदान तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व ३३ (१) (ओ) नुसार मतदारसंघात कोणत्याही व्यक्तीस गैरकृत्य करण्यास दि. ४ मे २०२६ पर्यंत मनाई करणारे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार मतदारसंघामध्ये कोणत्याही व्यक्तीस रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी गैरशिस्त वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोणत्याही मिरवणुका, रॅली, सभा ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त नेण्यास तसेच दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त आणि वेळेव्यतिरिक्त इतर मार्गाने नेण्यास व वेळेचे उल्लंघन करण्यास मनाई आहे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी आणि प्रार्थनास्थळांच्या आसपास प्रार्थनेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावरील किंवा सार्वजनिक जागी लोकांनी एकत्र जमण्याच्या ठिकाणी गर्दी करण्यास किंवा अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सर्व रस्त्यांवर, रस्त्यामध्ये, घाटात, घाटावर, सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यामध्ये, जत्रा, देवालय, मशीद, दर्गा आणि सार्वजनिक लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागांमध्ये गोंधळ घालण्यास, बेशिस्तपणे वागण्यास मनाई आहे. कोणत्याही रस्त्यात, रस्त्याजवळ किंवा अनियमित व विनापरवाना सार्वजनिक जागी वाद्ये वाजवण्यास, गाणी म्हणण्यास, ढोल-ताशे वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ, कोणत्याही उपाहारगृहात ध्वनिक्षेपकाचा विनापरवाना वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
याबाबत कोणास सवलत अगर परवानगीची आवश्यकता असल्यास २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
