अहिल्यानगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यादरम्यान झालेल्या चैनस्नॅचिंग प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. याप्रकरणी श्रीरामपूर येथील दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केलं असून, त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे २ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर त्यांचे दोघे साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये रविवारी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यातील ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर सुरेश कांबळे याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. सागर कांबळे हा चोरीच्या सोन्याची वाटणी करण्यासाठी ममदापूर फाटा येथे आला आणि तिथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कांबळे आणि त्याचे सहकारी ममदापूर फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचला.
पोलिसांनी ममदापूर फाटा येथून सागर सुरेश कांबळे (वय ३२, रा. वार्ड 1, श्रीरामपूर) आणि बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय ३६, रा. वार्ड 2 श्रीरामपूर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आतिक आयुब उर्फ आरीफ शेख आणि सनी विलास ढोकणे यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. हे दोन्ही साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यामध्ये पोलिसांनी सोने: ११.५ ग्रॅम वजनाचे (किंमत १,४९,५०० रुपये) किमती सोन्याचे दागिने, दोन हँडसेट मोबाईल (किंमत ७०,००० रुपये) एक मोटारसायकल (किंमत ७०,००० रुपये) असा एकूण २,८९,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे . सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने केली आहे.
