संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठारभागातील विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वार – शनिवार दि. १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता बिरेवाडी येथे होणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी दिली आहे.
अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साकूर ते बिरेवाडी रस्त्यासाठी ५ कोटी ४४ लाख रुपये, तास्करवाडी ते खंडेरायवाडी रस्त्यासाठी ७ कोटी ३९ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. तसेच साकुर, मांडवे बु., खांबे येथील महावितरणच्या ५ केव्ही ते १० केव्ही क्षमतेच्या वीज रोहित्र कामासाठी सुमारे ३ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या सर्व कामांचे लोकार्पण व भूमिपूजनाचा कार्यक्रम साकूर जवळील बिरेवाडी येथे होणार आहे.
तरी पठारभागातील शिवसेना – भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी केले आहे.
