मुंबई : यंदा केरळ येथे २६ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. केरळ येथे वेळेआधी पाऊस दाखल झाल्यास आणि अनुकूल परिस्थिती राहिल्यास महाराष्ट्रातही जूनच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण कोकणात पाऊस दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मुंबईतही पावसाचे आगमन यंदा लवकर होण्याची शक्यता आहे.यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.
राज्यात कधी दाखल होणार ?
सध्या राज्यात काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. तर काही भागात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून सर्वांचे लक्ष आता मोसमी पावसाच्या आगमनाकडे लागले आहे. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मोसमी पाऊस दाखल होत असतो. त्यानंतर साधारणपणे १० ते १२ दिवसात मोसमी पाऊस राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर दाखल होत असतो. मात्र, अनेकदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानेही होत असते. यंदा २६ मे च्या आसपास मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. तर राज्यात साधारणपणे ५ जूनच्या आसपास दक्षिण कोकणात मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज आहे.
मुंबईत मान्सूनचे आगमन कधी ?
अंदमान येथे मोसमी पावसाचे आगमन झाले की मुंबईत पाऊस कधी दाखल होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागते. मोसमी पावसाला अनुकूल स्थिती राहिल्यास आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाने दक्षिण कोकणात हजेरी लावल्यास मुंबईत साधारणपणे १० ते ११ जूनच्या आसपास मोसमी पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्यावर्षी २६ मे या दिवशी मोसमी पावसाचे आगमन मुंबईत झाले होते. तर २०१९ मध्ये उशिराने म्हणजेच २५ जून रोजी मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला होता. तर २०२७ मध्ये १० जूनला मोसमी पाऊस मुंबईत धडकला होता.
