संगमनेर – पठारभागात खळबळ, महिला डॉक्टरला लुटले

संगमनेर तालुक्यातील बोटा येथे एका धक्कादायक आणि थरारक चोरीची घटना समोर आली आहे. दोन महिन्यांच्या बाळासह घरात एकट्या असलेल्या महिला डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून दोन अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. रविवारी (१७ मे २०२६) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी डॉ. प्रियांका राहुल जाधव (वय ३४,ह.रा.बोटा) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई दूध आणायला गेली आणि चोरटे घरात घुसले…

फिर्यादी डॉ. प्रियांका जाधव या मूळच्या पुणे (कात्रज) येथील रहिवासी असून, त्या पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. प्रसूती झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून त्या बोटा (ता. संगमनेर) येथे आपल्या माहेरी आल्या आहेत. त्यांची आई मंगला पांडुरंग फटांगरे या प्राथमिक शाळेत शिक्षिका असून, भाऊ प्रथमेश हा सिव्हील इंजिनिअर आहे. १७ मे रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास भाऊ प्रथमेश कामानिमित्त आळेफाटा येथे गेला होता. तर आई मंगला या गावामध्ये दूध आणण्यासाठी घराचा दरवाजा ओढून बाहेर गेल्या होत्या. घरात डॉ. प्रियांका या त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह एकट्याच होत्या.

चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले….

आई घराबाहेर गेल्याची संधी साधत दोन अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. आत येताच एका चोरट्याने डॉ. प्रियांका यांना काहीही न बोलता थेट चाकूचा धाक दाखवला आणि हातातील सोन्याची अंगठी काढून देण्याचा इशारा केला. घाबरलेल्या अवस्थेत प्रियांका यांनी बोटातील अंगठी आणि जवळील ३,००० रुपये रोख रक्कम चोरट्यांच्या हवाली केली.

दरम्यान, दुसऱ्या चोरट्याने घरातील दुसऱ्या खोलीत घुसून कपाटाची आणि इतर साहित्याची उचकापाचक केली. आईने मेकअपच्या आरशाजवळ ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन दोन्ही चोरटे अत्यंत चलाखीने तेथून पसार झाले. आई मंगला दूध घेऊन घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सोन्याची अंगठी (फिर्यादीच्या हातातील), सोन्याची बांगडी, सोन्याची चैन (साखळी), सोन्याच्या तीन अंगठ्या (प्रत्येकी ६ ग्रॅम), रोख रक्कम (५०० रुपयांच्या ६ नोटा) असा एकूण ६,१९,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीही या घरात चोरी झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांचा तपास सुरू:..

भरवस्तीत आणि महिला डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून झालेल्या या धाडसी चोरीमुळे बोटा परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून,घारगाव पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Leave a Comment