पारनेर(DSNews24/किरण पुरी) हक्काच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांची आणि त्यांच्या नेत्यांची पोलिसांच्या माध्यमातून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप ‘भूमिपुत्र शेतकरी संघटने’चे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी केला आहे. १५ मे रोजी राज्यात झालेल्या वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनांनंतर आंदोलनकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, हे जुलमी गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी म्हणजेच १५ मे रोजी नगर-कल्याण महामार्गावर कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्याच दिवशी मुंबईत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत मिळावी यासाठी माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही आंदोलन छेडले होते. परंतु, या दोन्ही ठिकाणी आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आणि नेत्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले. या संपूर्ण प्रकारावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या संदर्भात बोलताना संतोष वाडेकर म्हणाले की, आज अत्यंत दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या घामाचे दाम सरकारला देता आलेले नाही. शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आपली बाजू सरकारसमोर मांडण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आंदोलन केले तरीही जर सरकार गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवणार असेल, तर हा सरळ सरळ शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हुकूमशाही प्रयत्न आहे.
वाडेकर यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणावर टीका करताना स्पष्ट केले की, इतर शासकीय योजनांच्या जाहिरातींसाठी आणि चमकोगिरीसाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. परंतु, ज्या बळीराजाच्या जिवावर देश चालतो, त्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना किंवा बजेट सरकारकडे नाही. सरकारने आता तरी डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, हीच आमची प्रमुख मागणी आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; तर आंदोलन करू
आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने केली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. जर सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला, तर आगामी काळात अजून प्रखरपणे रस्त्यावर उतरून शासनाला धारेवर धरू, असा इशारा भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिला.
