छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. संबंधित तरुण आपल्या पत्नीसह सासुरवाडीला धोंडे जेवणासाठी गेला होता. मात्र तिथेच तरुणासोबत घात झाला. सासुरवाडीत झालेल्या मारहाणीचा आणि अपमानाचा धक्का सहन न झाल्याने २८ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आयुष्य संपवलं आहे.
संतोष गोविंद चंडोल (वय २८, रा. केळगाव, ता. सिल्लोड) असं मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी मृत संतोषची पत्नी, मेव्हणा, सासू आणि चुलत सासरे अशा ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही हृदयद्रावक घटना भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथे घडली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चंडोल यांचा विवाह ७ वर्षांपूर्वी सोनाली हिच्याशी झाला होता. त्यांना एक चार वर्षांचा मुलगाही आहे. अधिक मास (धोंड्याचा महिना) निमित्त ‘धोंडे जेवणासाठी’ संतोष हे ४ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पत्नी सोनालीसोबत आपल्या सासरी म्हणजेच सुरंगळी येथे गेले होते. मात्र, सासरच्या घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
सासरच्यांकडून बेदम मारहाण
हा वाद एवढा विकोपाला गेला की, पत्नी सोनाली, मेव्हणा लखन एकनाथ दांडगे, सासू जनाबाई एकनाथ दांडगे आणि चुलत सासरे रमेश सुखदेव दांडगे यांनी एकत्र येत संतोष यांना बेदम मारहाण केली. सासरच्या घरात सर्वांसमोर झालेल्या या मारहाणीमुळे आणि झालेल्या गंभीर अपमानामुळे संतोष कमालीचे व्यथित झाले होते.
अपमानामुळे टोकाचे पाऊल
सासरवाडीत झालेल्या या अपमानास्पद वागणुकीचा धक्का सहन न झाल्याने संतोष यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि विष प्राशन केलं. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे केळगाव आणि सुरंगळी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून चंडोल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या दुर्दैवी घटनेनंतर मृत संतोष यांचे मोठे भाऊ भागवत गोविंद चंडोल यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी, मेव्हणा, सासू आणि चुलत सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
