काळे झेंडे, कांद्याच्या माळा अन् बैलगाडीतून मोर्चा ; पारनेर तहसीलवर जनआक्रोश”

पारनेर(DSNews24/किरण पुरी) सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सात बारा कोरा झाला पाहिजे मागणीसाठी तसेच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी हातात काळे झेंडे घेतले होते, तर अनेकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

मोर्चामध्ये शेतकरी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी बैलगाडीतून तहसील कार्यालयावर धडक देत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. वाढती महागाई, शेतमालाला मिळणारा अपुरा दर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि स्थानिक विकासकामांबाबत सरकारचे दुर्लक्ष या मुद्द्यांवर आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

खासदार निलेश लंके यांनी सरकारवर टीका करत शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. जनतेच्या न्याय्य मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता. मोर्चाच्यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Leave a Comment