मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी अखेर शिंदेसेनेत प्रवेश केला. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या सर्व ६ खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्याचा विश्वास देखील व्यक्त केला.
६ खासदार खऱ्या शिवसेनेत सामिल –
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे ६ टायगर आले आहेत. शिवसेना परिवारामध्ये हे आपले कट्टर शिवसैनिक खासदार सामिल झाले आहेत. त्यांचे सर्वांचे शिवसेनेत स्वागत. ४ वर्षांपूर्वी २२ जून २०२२ रोजी शिवसेनेत आम्ही उठाव केला. तेव्हा ४० आमदार आमच्यासोबत सुरुवातीला होते. पुन्हा चौकार नाही तर आता षटकार मारला आहे. २०२२ मध्ये शिवसेना पक्ष, धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आपण उठाव केला होता. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आपला लढा बाळासाहेबांच्या आणि हिंदुत्वाच्या विचारांचा आहे. शिवसेनेचे विचार तिथे शिवसैनिक. म्हणून आज या ६ खासदारांनी बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेत सामिल होण्याचा निर्णय घेतला.’
जनतेने आमचा निर्णय स्वीकारला –
सर्व खासदारांच्या पाठिशी शिवसेना आहे असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ‘सर्व खासदारांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. आमराजे मनाचे राजे. ओमराजेंनी कार्यकर्त्यांसोबत बोलणं केलं आणि मतदारसंघात विकास झाला पाहिजे, कामं झाली पाहिजे या विचारानंतर त्यांनी निर्णय घेतला. हे सर्व खासदार कुणीही स्वत:च्या स्वार्थासाठी फायद्यासाठी आले नाही तर लोकांना न्याय देण्यासाठी आले आहेत. एकनाथ शिंदे आणि शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे. काही लोकं म्हणतात आम्ही कुणाला आडवायला, तुडवायला नाही तर आम्ही शिवसेना वाढवायला आलो आहे. २०२२ चा उठाव आपण पाहिला आहे. जनतेने आमचा निर्णय स्वीकारला. जर निवडून कुणी आले नाही तर मी राजीनामा देईल आणि गावी जाऊन शेती करेल असे मी सांगितले होते. ४० होते ते ६० आमदार निवडून आले. मी गावी गेलो की काहींना पोटदुखी होते.’
दिलेला शब्द पाळणारी शिवसेना –
शिंदेंनी पुढे सांगितले की, ‘चांदा ते बांधापर्यंत शिवसेना मोठी झाली. आमची निती स्पष्ट आणि स्वच्छ होती. विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. काही लोकांनी विचारधारा सोडली महाराष्ट्राने त्यांना नाकारलं. लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही देण्याचे काम केले. शिवसेनेत प्रचंड प्रमाणात लोकं येत आहेत. आपला अजेंडा गोरगरिबांच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे हा आहे. दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे. सहा खासदार सोबत आले आहेत. ते देखील त्यांच्या मतदारसंघात लाखो लोकांच्या मतदानावर निवडून आले. त्याठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि तिथली जनता आणि या ६ लोकांची ताकद यामुळे शिवसेना अधिक बळकट होईल. जे खासदार इथे आले आहेत त्यांच्या मतदारसंघातील सर्व कामं प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम शिवसेना करेल हा माझा शब्द आहे. मी दिलेला शब्द पाळतो.’
इथे कुणी मालक नाही तर सहकारी आहोत –
तसंच, ‘मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून वागलो आणि आजही तसाच वागतो. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सर्व खासदारांना हेच सांगेल इथे कुणी मालक नाही आपण सर्व सहकारी आहोत. सर्व नेता नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करणार आहोत. मी सर्वांना मानसन्मान देईल आणि त्यांचा आदर ठेवेल. कुणाचा कुठेही अनादर होणार नाही. आपण सर्व एकाच परिवारात आलो आहोत. त्यामुळे कुटुंबं म्हणून आपण पुढची वाटलाच करू. हे डबल इंजिनचे सरकार आहे या सरकारमध्ये आपली कामं होतील. तुमचे सर्व प्रश्न आपल्याला सोडवता येतील. कुठेही काही अडचण येणार नाही. आपण सगळ्यांना मिळून शिवसेना मोठी करायची आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करा.’, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
