अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने (IMD) २२ ते २६ जून २०२६ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार मेघगर्जना व वादळी वाऱ्याच्या काळात झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये. वीज चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा तसेच ट्रान्सफॉर्मर, वीजवाहिन्या, धातूचे खांब आणि टॉवर्सपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्ज किंवा जाहिरात फलक कोसळण्याचा धोका असल्याने अशा ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेत अडकल्यास खाली बसून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.
धरणे, नद्या आणि ओढ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. पाण्याच्या प्रवाहात उतरणे टाळावे तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वादळी वारे, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा आणि जनावरांचेही सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष, तहसील कार्यालय अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.
