शिंदे गटाच्या शिवसेनेत गेलेले सहा खासदार आणि एकनाथ शिंदेंसाठी धक्का बसण्याची शक्यता आहे. सहा खासदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची बतावणी करणाऱ्या एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठा डाव टाकला आहे. ठाकरे गटाने टाकलेल्या डावामुळे शिंदे गटात गलेल्या खासदारांवर अपात्रेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी या सहा खासदारांनी आधी वेगळा गट स्थापन केला, त्यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना निवदेन पत्र देखील दिले. निवेदन मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लागलीच गटाची मान्यताही दिली सुद्धा. गटाची मान्यता मिळाल्यानंतर या खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला.
जेव्हा एखाद्या पक्षातून दोन तृतियांश खासदार एकाचवेळी बाहेर पडतात, तेव्हा अशा खासदारांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेश ग्राह्य धरला जातो. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही. त्यामुळेच आम्ही सर्व संविधानातील तरतुदीचे पालन करून आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच हा पक्षप्रवेश घडवून आणला. यामुळे आमचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याच उपमुख्यमंत्री आणि शिंदे गट शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं.
परंतु आता ठाकरे गटांनी थेट शिंदेंना धक्का देण्याची तयारी केली आहे. ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी केलेल्या दाव्यामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट आलंय. लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अरविंद सावंत आणि प्रतोत अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांसोबत जवळपास 35 मिनिटे चर्चा केली. या चर्चेनंतर अनिल देसाई यांच्याकडून मोठा दावा करण्यात आलाय.
ठाकरे गटाचा काय आहे दावा? खासदारांवर कारवाई होणार?
याप्रकरणी बोलताना खासदार अनिल देसाई म्हणाले, शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांचा आकडा हा दोन तृतीयांश असला तरी शिवसेना ठाकरे गट हा मुळ पक्ष आहे. त्यामुळे जरी त्यांनी वेगळ्या गटाचा दावा केला असला तरी संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे, त्यामध्ये जी मुळ ओरिजनल पार्टी आहे, ती जर एखाद्या पक्षात विलीन होत असेल तर त्या विलिनीकरणाला एकूण खासदारांपैकी दोन तृतियांश खासदारांचा पाठिंबा असला पाहिजे.
मात्र इथे मुळ पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे गट हा कोणत्याही पक्षात विलीन झाला नाहीये. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे अशा पद्धतीने या खासदारांना पक्षातून बाहेर पडता येत नाही. या खासदारांनी संविधानातील तरतुंदीचं उल्लंघन केलंय. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी न्यायिक भूमिका घ्यावी, अशी विनंती आम्ही केल्याची माहिती अनिल देसाई दिली आहे.
शिंदे गटात गेलेल्या खासदारांवर होणार कारवाई?
लोकसभा अध्यक्षांनी देखील संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जी प्रोव्हिजन आहे, तिची नोंद घेतली आहे, असा दावा देसाई यांनी केला आहे. जे बंडखोर खासदार आहेत, त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जे अधिकृत चिन्ह आहे, जे निवडणूक आयोगाने दिले आहे. मशाल या चिन्हावर ते निवडून आले होते. ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते, ज्याची लोकसभेच्या सभागृहात नोंद होते. तेव्हा ती पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते. तिच्या नोंदीमध्ये हे सर्व सभासद आहेत. त्यामुळे यांना घटनेचे संविधानाचे सर्व नियम लागू आहेत, हे सर्व शिवसेना ठाकरे पक्षाचे सदस्य आहेत. आमचा पक्ष कोणत्याही पक्षात विलिन झालेली नाही, त्यामुळे हा नियम त्यांना लागू होत नाही, असा दावाही यावेळी देसाई यांनी केलाय.
