अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात २९ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २५ ते २९ जूनपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस ३० ते ४० कि.मी. प्रतितास सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये.
टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र व लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. मदतीसाठी नजीकचे पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
यादरम्यान अहिल्यानगरसह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असेल; तर पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असून, मान्सून लांबल्यास त्याचा थेट परिणाम खरीप हंगामाच्या पेरण्यांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
