साकूरमध्ये महाराजस्व समाधान शिबीर ; विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप

महसूल, कृषी व शासकीय योजनांच्या सेवांचा लाभ एकाच ठिकाणी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न गावपातळीवरच सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत साकूर येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. साकूर सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या शिबिरात विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

महायुती सरकारच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात नागरिकांच्या महसुली व शासकीय योजनांशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यात आला. यावेळी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या हस्ते विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास पुरवठा अधिकारी रसिक सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, बाबासाहेब गुळवे, संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून अनिल कुंदेकर, अमृता कोळपकर, मंडळाधिकारी विश्वजीत चौगुले, तलाठी सोमनाथ शेरमाळे, गणेश सोनवणे, लक्ष्मण गोंदके, भोरू पारधी, कृषी विभागाचे संतोष गडाख, ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात प्रलंबित फेरफार व वारस नोंदी निकाली काढणे, जिवंत 7/12 मोहिम, उत्पन्न, रहिवासी व जात दाखले, सामाजिक योजनांसाठी अर्ज, नमुना ६, ७ व ८ स्वीकारणे, जमीन भोगवटा वर्ग रूपांतरण, 7/12 दुरुस्ती, घरकुल पट्टे वाटप, ई-मोजणी, पीएम किसान नोंदणी, तक्रार निवारण तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले.

यावेळी बोलताना तहसीलदार धीरज मांजरे यांनी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी हा उपक्रम राज्य शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि महसूल विषयक प्रश्न त्वरित निकाली काढणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शंकरराव खेमनर, रऊफ शेख, गुलाबराजे भोसले, अमृता कोळपकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मिसाळ यांनी केले. प्रास्ताविक मंडळाधिकारी विश्वजीत चौगुले यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे यांनी मानले.

Leave a Comment