लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याने १८४ रूग्णांना २ कोटींची वैद्यकीय मदत

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मोठा दिलासा मिळाला असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 184 रुग्णांना तब्बल 2 कोटी 6 लाख 35 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच विविध धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली.

यशोधन जनसंपर्क कार्यालयामध्ये नागरिकांना वैद्यकीय सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यरत आहे. या कक्षाच्या माध्यमातून चालू वर्षात 184 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 कोटी 84 लाख रुपयांची मदत मिळाली. तसेच टाटा ट्रस्ट, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई, ईफको आणि श्री साईबाबा संस्थान यांच्या माध्यमातून आणखी 22 लाख रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली.

सध्या वाढत्या आजारांमुळे उपचारांचा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व विविध धर्मादाय संस्थांकडून मदत मिळवून देण्यासाठी यशोधन कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

याचबरोबर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमधून 2,253 नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी 12 विशेष कॅन्सर तपासणी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये 912 महिलांची तपासणी करण्यात आली असून काही महिलांमध्ये प्राथमिक लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.

तसेच तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, वैद्यकीय बिलात सवलत मिळवून देणे आणि आवश्यक मार्गदर्शन करणे अशी महत्त्वाची कामेही हा कक्ष करीत आहे. आरोग्यविषयक मदत व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी यशोधन कार्यालयातील आरोग्य विभागाचे अविनाश आव्हाड मो. 7020641296 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळवून देणे हे आमचे प्राधान्य” – डॉ. जयश्रीताई थोरात

तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना उपचारांचा खर्च परवडत नसल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळवून दिला जात आहे. महिलांच्या कॅन्सर तपासणी मोहिमेत 912 महिलांची तपासणी करण्यात आली असून काही महिलांमध्ये प्राथमिक अवस्थेत कॅन्सरची लक्षणे आढळली आहेत. पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी अशा तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॅन्सरतज्ज्ञ व युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले.

Leave a Comment