ब्रेकिंग! पठार भागाची जीवनदायी मुळा नदी अखेर वाहती; यंदा १५ दिवसांच्या उशीराने नदीपात्रात पाणी

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी उगम पावणाऱ्या मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने आंबीत व पिंपळगाव खांड धरणे ओव्हरफ्लो झाली असून, अखेर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जीवनदायी मुळा नदी यंदा १५ दिवसांच्या उशिराने वाहती झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हरिश्चंद्रगड परिसरातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातून आलेले पावसाचे पाणी प्रथम आंबीत धरणात साचले. धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर हा प्रवाह पिंपळगाव खांड धरणाकडे गेला. ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणही भरून ओव्हरफ्लो झाल्याने मुळा धरणाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि अनेक दिवस कोरडे पडलेले मुळा नदीपात्र पुन्हा जिवंत झाले.

गेल्या वर्षी १९ जून रोजी मुळा नदी वाहती झाली होती. मात्र यंदा पावसाने उशिरा जोर धरल्याने तब्बल १५ दिवस उशिराने नदी वाहू लागली. संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या गावांतील नागरिक नदी वाहण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

मुळा नदी वाहू लागल्याने नदीवर अवलंबून असलेल्या अनेक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच साकूरसह पठार भागात शनिवारपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून शेतकरी पेरणीच्या कामाला वेगाने लागले आहेत.

दरम्यान, पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने डोंगर-दऱ्या हिरव्यागार झाल्या असून ओढे-नालेही प्रवाही झाले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त असून खरीप हंगामाला सकारात्मक सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment