महाराष्ट्रात ६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, मुख्यमंत्री कार्यालयाकडून नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यास सुरूवात झाली आहे. अनेक नद्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने 4 ते 6 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात माध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि डोंगराळ भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्थानिक प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन करत आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहावे, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे

विशेषतः सखल भाग, नदीकाठ, डोंगराळ परिसर आणि घाट रस्त्यांवर राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. वादळी वाऱ्यांसह होणाऱ्या मुसळधार पावसामुळे झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होणे, दरडी कोसळणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचा सल्ला देखील प्रशासनाने दिला आहे. पाणी साचलेल्या रस्त्यांवरून किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले असून नदीकाठ, सखल वस्त्या आणि डोंगर उतारांवर राहणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा.

त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हेल्पलाईन क्रमांक 1916, पालघर हेल्पलाईन 02525-297474 आणि +91 8237978873, ठाणे महानगरपालिकेचे हेल्पलाईन क्रमांक 022-25364779, 022-25301740 आणि +91 9372338827, ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे क्रमांक 1800-222-108 आणि 8657887101, तसेच पनवेल महानगरपालिकेचे हेल्पलाईन क्रमांक 022-27458040, 022-27458041 आणि 022-27458042 जारी करण्यात आले आहेत. राज्य सरकारने नागरिकांना अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment