साकूर पठारभागातील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त एसटी बस फेऱ्या सुरू होणार ; रऊफ शेख यांच्या मागणीला यश

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) साकूर पठारभागातील हिवरगाव पठार, जांबुत बुद्रुक, जांबुत खुर्द, मांडवे बुद्रुक आणि शिंदोडी येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी साकूर येथे ये-जा करतात. विशेषतः विद्यार्थिनींची संख्या मोठी असल्याने शाळेच्या वेळेत एसटी बसची सुविधा नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकांना खाजगी व अनोळखी वाहनांमधून प्रवास करावा लागत असल्याने सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.

या समस्येची गंभीर दखल घेत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी हिवरगाव पठार येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोसावी यांच्या समवेत, आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार संगमनेर एसटी आगाराचे व्यवस्थापक प्रशांत गुंड यांची भेट घेत विद्यार्थ्यांची गैरसोय निदर्शनास आणून दिली.

यावेळी साकूर–मांडवे/शिंदोडी, साकूर–जांबुत आणि साकूर–हिवरगाव पठार या मार्गांवर शालेय वेळेनुसार अतिरिक्त एसटी बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीची दखल घेत आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या सोमवारपासून विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त एसटी बस फेऱ्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

या निर्णयाचे स्वागत करत रऊफ शेख यांनी परिसरातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एसटी बस पास काढून नियमित बस सेवेचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

या निर्णयामुळे साकूर पठारभागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, नियमित आणि सोयीस्कर प्रवासाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याची भावना पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ, संगमनेर एसटी आगाराचे व्यवस्थापक प्रशांत गुंड आणि रऊफ शेख यांचे पालक व विद्यार्थ्यांनी आभार मानले.

Leave a Comment