40 वर्षांनंतर हिवरगाव पठारावर संगमनेर आगाराची बस; विद्यार्थी-ग्रामस्थांचा जल्लोषात स्वागत सोहळा

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागातील हिवरगाव पठार, मांडवे, शिंदोडी व जांबुत परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. तब्बल 40 वर्षांनंतर संगमनेर आगाराची एसटी बस हिवरगाव पठार, शिंदोडी आणि मांडवे येथे नियमित धावू लागली असून, बसचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.

या बससेवेसाठी आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी हिवरगाव पठार येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोसावी यांच्या समवेत संगमनेर आगाराचे व्यवस्थापक प्रशांत गुंड यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने आजपासून बससेवा सुरू झाली आहे.

आज सकाळी बस हिवरगाव पठार येथे दाखल होताच विद्यार्थी, प्रवासी आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात व जल्लोषात बसचे स्वागत केले. यावेळी बसचे चालक साहेबराव काळे, वाहक गोंदके तसेच भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना रऊफ शेख यांनी ही बससेवा आमदार अमोल खताळ पाटील यांच्या भक्कम सहकार्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. भविष्यातही परिसरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी राजेंद्र गोसावी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “तब्बल 40 वर्षांनंतर प्रथमच हिवरगाव पठार येथे संगमनेर आगाराची बस दाखल झाली असून हा संपूर्ण गावासाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे.” यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी राजेंद्र गोसावी, शाबु काळे, रावसाहेब केकाण, बाळासाहेब वनवे, गजानन खाडे, प्रकाश मिसाळ, नवनाथ मिसाळ, भरत वनवे, आसिफ शेख, करीम सय्यद, शांताराम वनवे, रामदास खाडे, धर्मा सांगळे, सुभाष डोळझाके, भाऊसाहेब सरोदे, सोमनाथ नागरे, कोंडीभाऊ सांगळे, भाऊ खाडे, दत्तात्रय नागरे, राजू वनवे, हरिभाऊ नागरे, अन्सार शेख, शरपुद्दीन शेख, सदाशिव वनवे यांच्यासह ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment