घरात घुसून वृद्ध दाम्पत्यावर दरोडा ; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास, पठार भागात खळबळ 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील जांबुत खुर्द (म्हसोबाची वाडी) येथे तीन अज्ञात दरोडेखोरांनी मध्यरात्री एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सुमारे २ लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. ८) मध्यरात्री घडलीय. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. दरम्यान या घटनेची संपूर्ण पठार भागात एकच खळबळ उडाली आहे.

घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सखुबाई लहानु पारधी (वय ८०, रा. जांबुत खुर्द, ता. संगमनेर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, ८ जुलै रोजी पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्या व त्यांचे पती लहानु सावळेराम पारधी हे घरात झोपलेले असताना तोंड बांधलेल्या तीन अज्ञात इसमांनी घरात प्रवेश केला.

यातील एका चोरट्याने त्यांच्या पतीचे तोंड दाबून धरले, तर अन्य दोघांनी सखुबाई यांचे तोंड दाबून त्यांना पकडून ठेवले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच घरातील उशाखाली ठेवलेली रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली.

सखुबाई यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारे शिवाजी सखाराम बिडकर मदतीसाठी धावून आले. मात्र, चोरट्यांपैकी एकाने त्यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले आणि तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.

चोरट्यांनी सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची पोत, दीड तोळ्यांच्या चार सोन्याच्या पुतळ्या व एक पान, अर्धा तोळ्याचे सोन्याचे डोरले तसेच २ हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment