धक्कादायक.. पंढरीच्या वाटेनं निघालेल्या वारकऱ्याला भरधाव कारन चिरडल

बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात एका ज्येष्ठ वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर आणि इंदोरी गावावर शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात बारामतीमधील भिगवण रोडवर असलेल्या हॉटेल शिवदुर्गसमोर काल रात्री घडला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाच्या मागे चालणाऱ्या १९ क्रमांकाच्या दिंडीचे मालक रमेश गायकवाड यांच्या दिंडीतील वारकरी रस्त्यावरून पायी चालत जात होते. त्याच वेळी मागून आलेल्या एका अतिशय भरधाव आणि अनियंत्रित कारने या वारकऱ्याला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, कारच्या धडकेमुळे वारकऱ्याचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव विष्णू रामचंद्र पवार (वय वर्ष ६७) असे आहे. ते पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी गावचे (वाघजाई मंदिराजवळ) रहिवासी होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते विठ्ठल भेटीच्या ओढीने माऊलींच्या पालखीसोबत पायी चालत होते. मात्र, पंढरपूर जवळ येण्याआधीच बारामतीत त्यांच्या प्रवासाचा असा करुण अंत झाला.

या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण पालखी मार्गावर एकच खळबळ उडाली. प्रशासनाने आणि रेस्क्यू टीमने तातडीने रात्रीच या घटनेची गंभीर दखल घेतली. कायदेशीर सोपस्कार आणि पंचनामा पूर्ण केल्यानंतर, भावुक वातावरणात मृत विष्णू पवार यांचे पार्थिव रुग्णवाहिकेने त्यांच्या मूळ गावी म्हणजेच मावळमधील इंदोरी येथे रवाना करण्यात आलं.

Leave a Comment