आमदार अमोल खताळ फिल्डवर! साकूर – बिरेवाडी रस्त्याच्या कामाची अचानक पाहणी अन्

संगमनेर (DSNews24 / किरण पुरी) आमदार अमोल खताळ यांच्या कामाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर दौऱ्यावर असताना त्यांनी साकूर–बिरेवाडी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची कोणतीही पूर्वसूचना न देता प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता आणि प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

पाहणीदरम्यान आमदार खताळ यांनी रस्त्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत उत्कृष्ट दर्जाचे व गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना टिकाऊ आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध व्हावा, यासाठी काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

साकूर–बिरेवाडी रस्त्यासाठी तब्बल ४० वर्षांनंतर पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून सुमारे पावणे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या भूमिपूजनावेळी आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदारांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की, “मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुम्हाला नारळ दिला आहे; मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाले किंवा गुणवत्तेत तडजोड केली, तर गावातून तुमची मिरवणूक काढू.”

या इशाऱ्यानंतर आता आमदार खताळ यांनी थेट कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत दर्जाची खातरजमा केली. विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कामांची तपासणी करणारी त्यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा नागरिकांना अनुभवायला मिळाली. त्यांच्या अचानक पाहणीमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासन आणि ठेकेदारांमध्येही अधिक जबाबदारीची भावना निर्माण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, कायदा सेलचे जिल्हा संयोजक ॲड. अमित धुळगंड, भास्कर ढेंबरे, माजी सरपंच लहानू सागर, आनंदा सागर, नवनाथ ढेंबरे, चेतन फासाटे, संकेत सागर, सुभाष ढेंबरे, रोहिदास भोसले, लहानू पिंगळे, नवनाथ कोळपे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ ढेंबरे, डॉ. सुनील ढेंबरे, बाळू ढेंबरे आदी उपस्थित होते.

Leave a Comment