पारनेर बस स्थानकातील स्वच्छतागृहाचा प्रश्न ऐरणीवर ; भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

पारनेर(DSNews24/किरण पुरी) पारनेर बस स्थानकात महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच पंढरपूरकडे ये-जा करणाऱ्या वारकरी भाविकांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज स्वच्छतागृहाची तातडीने व्यवस्था करावी, अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पारनेर आगार प्रमुखांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, पारनेर बस स्थानक हे तालुक्यातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक केंद्र असून दररोज हजारो प्रवासी येथे ये-जा करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी तसेच पंढरपूरकडे जाणारे व परतणारे वारकरी मोठ्या संख्येने या स्थानकाचा वापर करतात. मात्र, स्वच्छ व वापरण्यायोग्य स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

संघटनेने बस स्थानकात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, नियमित साफसफाई आणि देखभालीची प्रभावी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

सात दिवसांत कार्यवाहीची मागणी

निवेदनाची प्राप्ती झाल्यानंतर सात दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करून त्याबाबत लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा विभागीय नियंत्रक, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, संबंधित सक्षम प्राधिकरण तसेच लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात येईल. याशिवाय जनहितासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतोष वाबळे, अरुण बेलकर, अनिल सोबले, जालिंदर लंके, अवि देशमुख आणि विक्रम काळे यांनी दिला आहे.

Leave a Comment