मांडवे बुद्रुकमध्ये अवतरणार ‘अवघी पंढरी’! आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी दर्शन

संगमनेर (DSNews24 / किरण पुरी) – “ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा… चला पाहू रे सोहळा पंढरीचा…” या भक्तिमय वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमून गेला आहे. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले असून राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महिन्याच्या पहिल्या एकादशीला प्रवचनाची परंपरा अखंड

याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथेही एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. थोरात कारखान्याचे संचालक रामदास धुळगंड सर व ह.भ.प. दत्तात्रय महाराज धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवक व ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने गेल्या दोन वर्षांपासून दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला प्रवचनाची परंपरा अखंड सुरू आहे.

धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श उपक्रम

विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम मुस्लिम बांधव भिकन बाबुलाल शेख यांच्या संकल्पनेतून सुरू झाला आहे. या उपक्रमात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्यामुळे धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा हा आदर्श उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक कार्यक्रमात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरवही केला जातो.

आज मांडवे बुद्रुकमध्ये अवतरणार ‘अवघी पंढरी’

आषाढी एकादशी निमित्त ग्रामस्थांनी विशेष भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी विठ्ठल-रुक्मिणीच्या सुंदर मूर्तींची दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आज मांडवे बुद्रुकमध्ये जणू ‘अवघी पंढरी’ अवतरणार असल्याची भावना भक्तांमध्ये व्यक्त होत आहे. सायंकाळी ५ वाजता शिवमंदिर – साई ॲग्रो मॉल – चानखणबाबा मंदिर – गावफेरी – मारुती मंदिर अशी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. या प्रदक्षिणेत शेकडो वारकरी ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. घुले बाबा यांचे जाहीर हरिकिर्तन होणार असून त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुढील दोन वर्षांच्या अन्नदान पंगतींच्या अन्नदात्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

कै. लक्ष्मण नाना धुळगंड यांच्या स्मरणार्थ अन्नदान

आषाढी एकादशीच्या निमित्ताने कै. लक्ष्मण नाना धुळगंड यांच्या स्मरणार्थ धुळगंड परिवाराच्या वतीने भव्य अन्नदान करण्यात येणार आहे.

चर्चेचा विषय

धर्म, समाजसेवा, अन्नदान आणि सर्वधर्म समभावाचा अनोखा संगम घडवणारा हा उपक्रम पाहता मांडवे बुद्रुक हे अशा स्वरूपाचा उपक्रम सातत्याने राबविणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

Leave a Comment