आमदार असावा तर असा..! अर्ध्या रात्री आमदार अमोल खताळ शेतकऱ्याच्या दारी

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) आर्थिक संकटात सापडलेल्या आणि चिंतेने व्याकूळ झालेल्या पेमगिरी येथील शेतकरी सोमनाथ किसन गोडसे यांच्या मदतीसाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी शनिवारी रात्री पावणे बारा वाजता थेट त्यांच्या घरी धाव घेतली. खडतर रस्त्यामुळे चारचाकी वाहन जाऊ शकत नसल्याने त्यांनी दूध वाहतूक करणाऱ्या वाहनातून सुमारे चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करून शेतकऱ्याची भेट घेतली. आमदार मध्यरात्री आपल्या दारात आल्याने सोमनाथ गोडसे भावूक झाले. आमदार खताळ यांच्या या संवेदनशील कृतीची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

पेमगिरी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी सोमनाथ गोडसे यांनी दोन एकर क्षेत्रातील डाळिंब बागेवर रासायनिक औषधाची फवारणी केली होती. मात्र फवारणीनंतर संपूर्ण बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत त्यांचे सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला असून वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरल्याने ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

डाळिंब बागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आपण यावे, अशी विनंती गोडसे यांनी आमदार खताळ यांच्याकडे केली होती. विनंतीचा मान राखत आमदार खताळ यांनी मध्यरात्रीच त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. अत्यंत खडतर रस्त्यामुळे स्वतःचे वाहन सोडून त्यांनी दूध वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास केला आणि गोडसे यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली.

यावेळी शेतकरी गोडसे यांनी संपूर्ण घटनाक्रम आणि झालेल्या नुकसानीची माहिती आमदार खताळ यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आमदार खताळ यांनी तेथूनच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. गोडसे यांना बनावट किंवा बोगस रासायनिक औषधे देण्यात आली असल्याची खात्री करून संबंधित कृषी सेवा केंद्रावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, तसेच बाधित शेतकऱ्याला शासनाच्या नियमांनुसार शक्य ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या.

Leave a Comment