उद्धव ठाकरेंच्या दाव्याने शिंदे गटात खळबळ, धनुष्यबाण’ चिन्ह….

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी, सर्वोच्च न्यायालय ‘धनुष्यबाण’ चिन्ह आपल्यालाच देईल आणि तसे न झाल्यास ते चिन्ह गोठवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

आज झालेल्या पक्षाच्या ऑनलाइन बैठकीत ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांशी संवाद साधला. या बैठकीत संघटनात्मक विषयांसह सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावरही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

बैठकीदरम्यान ठाकरे यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत, पक्षाला आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाला न्याय मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. तसेच, कोणत्याही परिस्थितीत हे चिन्ह दुसऱ्या गटाकडे जाणार नाही आणि गरज पडल्यास ते गोठवले जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते.

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील वादावर २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. नुकतीच या प्रकरणाची सुनावणी पार पडली असून अंतिम निर्णयाकडे ठाकरे गट, शिंदे गट आणि राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment