मुंबई – राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर भरणारे ९४ हजार शेतकरी अपात्र ठरले असल्याची माहिती समोर आली आहे.
सहकार विभागाच्या माहितीनुसार, योजनेतील उर्वरित १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी एकाच टप्प्यात सुमारे ७ हजार कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
याशिवाय, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील स्वतःचा हिस्सा बँकेत भरल्यानंतर ‘एकवेळ समझोता’ योजनेअंतर्गत सरकार त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाख रुपये जमा करणार आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठविण्यात आली होती. त्यामध्ये ९४ हजार प्राप्तिकर भरणारे शेतकरी आढळून आल्याने त्यांना योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे.
दरम्यान, उर्वरित १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (e-KYC) पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पीक कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे.
