अहिल्यानगर : प्रसिद्ध कीर्तनकार यांनी प्रथमच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक आठवणी उलगडल्या. त्यात अवघ्या २० रुपयांत झालेल्या आपल्या लग्नाचा किस्सा त्यांनी खास शैलीत सांगितला.
इंदुरीकर महाराज म्हणाले की, त्यांच्या वडिलांचे वय झाले होते. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांसमोरच मुलाचे लग्न व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. यामुळे लग्न ठरल्यानंतर केवळ आठ दिवसांत विवाहसोहळा पार पडला. संगमनेर तालुक्यातील दाढ येथील मंदिरात हा साधा आणि अत्यंत मितव्ययी विवाह झाला.
“माझ्या लग्नासाठी फक्त २० रुपये खर्च झाले. त्या पैशांत दोन हार घेतले आणि लग्न झाले. माझी पत्नी गरीब कुटुंबातील आहे. गरिबाचीच मुलगी पत्नी म्हणून स्वीकारायची, असा माझा आधीपासूनच निर्धार होता,” असे त्यांनी सांगितले.
लग्नाच्या दिवशीही त्यांनी आपली कीर्तनसेवा थांबवली नाही. “दोन कीर्तनांच्या मध्ये माझे लग्न झाले. विशेष म्हणजे माझी पत्नीही कीर्तनकार असल्याने तिनेही त्याच रात्री एक कीर्तन केले,” असा रंजक किस्साही त्यांनी सांगितला.
आपल्या कीर्तनशैलीबद्दल बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, त्यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ग्रामीण वातावरणात झाला. त्यामुळे ग्रामीण बोलीभाषा आणि साधेपणा त्यांच्या स्वभावातच रुजला. “कृत्रिम गोष्टी फार काळ टिकत नाहीत. नैसर्गिकपणा कायम लोकांच्या मनात राहतो. माझ्या कीर्तनातील विनोद, उदाहरणे आणि भाषा ही माझ्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित असल्याने ती थेट श्रोत्यांच्या मनाला भिडते,” असे त्यांनी नमूद केले.
