साकूरमध्ये भर सकाळी बिबट्याचा धूमाकूळ; आठवडे बाजाराच्या दिवशी नागरिकांमध्ये घबराट

संगमनेर (DSNews24 / किरण पुरी): संगमनेर तालुक्यातील साकूर येथे आठवडे बाजाराच्या दिवशी अमननगरमध्ये भर सकाळी बिबट्याने दर्शन देत धूमाकूळ घातल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या अचानक झालेल्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याला पाहताच चार ते पाच कुत्रे त्याच्या मागे लागले. कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने वैतागलेल्या बिबट्याने तेथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार काही काळ सुरू असल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली.

आठवडे बाजारासाठी मोठ्या संख्येने नागरिक साकूरमध्ये येत असल्याने या घटनेने सर्वांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Comment