विखे – गडाख भेटीने अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत वेगवान आणि नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याचे महसूल व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांच्या नगर येथील ‘विरंगुळा’ या निवासस्थानी जाऊन समक्ष भेट घेतली. दशकांपासून राजकीय हाडवैर असलेल्या या दोन मातब्बर घराण्यांमधील या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘सदिच्छा’ भेटीला जिल्हा बँकेची किनार?

अधिकृतपणे ही भेट यशवंतराव गडाख यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी असलेली सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकीय समीकरणांची घडी बसवण्यासाठीच ही चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनी गडाख यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आता थेट पालकमंत्री विखे पाटील यांनी गडाख यांच्याशी चर्चा केल्याने या भेटीला जिल्हा बँक निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट होत आहे.

राम शिंदेंच्या रणनीतीला शह देण्यासाठी विखेंची मोर्चेबांधणी?

जिल्हा बँकेत विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या वर्चस्वाला पर्याय देण्यासाठी प्रा. राम शिंदे स्वतंत्र रणनीती आखत असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्या या संभाव्य पॅनलला शह देण्यासाठी आणि निवडणूक बिनविरोध काढण्याच्या दृष्टीने विखे पाटील यांनी सावध पावले टाकत गडाखांशी संपर्क साधल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. ऐनवेळी जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध झाली तरी आश्चर्य वाटू नये, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.

Leave a Comment