सांगली – देशभरात काल ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मात्र या आनंदाच्या दिवशी मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. कोकरूड येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मनोहर शामराव कांबळे (वय ४५) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कोकरूड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मनोहर कांबळे हे कोकरूड येथील मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यानंतर गावातील बाजारपेठेत आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमालाही त्यांनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात विद्यार्थी व्यासपीठावर स्वातंत्र्यगीत सादर करत होते. त्यावेळी कांबळे हे स्टेजसमोर उभ्या असलेल्या लहान मुलांना शिस्तीत उभे करत त्यांना मार्गदर्शन करत होते. मुलांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
घटना लक्षात येताच उपस्थित नागरिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना जवळच्या घरात नेले. त्यांना साखरपाणी देण्यात आले. काही वेळाने त्यांना थोडे बरेही वाटले. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्वातंत्र्य दिनाचा आनंदाचा सोहळा सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने उपस्थितांना मोठा धक्का बसला. विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते जपणारे आणि शाळेत मनापासून सेवा बजावणारे शिक्षक मनोहर कांबळे यांच्या अचानक निधनाने शैक्षणिक वर्तुळासह संपूर्ण कोकरूड परिसरावर शोककळा पसरली आहे.
कांबळे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शिराळा तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
