“राजकारणात आलो आणि माझाच मेंदू…? सुजय विखे पाटलांच वक्तव्य चर्चेत

राहुरी : अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांना होणारा विरोध, कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तसेच ठेकेदाराला होणारी मारहाण यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपल्या खास मिश्कील शैलीत, “मी मेंदूचा डॉक्टर आहे; परंतु राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,” अशी टिप्पणी केली.

राहुरी येथे केलेल्या भाषणात सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. नगर जिल्ह्यात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, नगर-मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याचेही त्यांनी मान्य केले.

नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत बोलताना विखे पाटील यांनी युद्धजन्य परिस्थितीचा संदर्भ दिला. डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम रस्त्यांच्या कामांवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ आंदोलन करणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणे हा समस्येवरचा उपाय नसल्याचे सांगत त्यांनी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा, असे आवाहन केले.

यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही त्यांनी मिश्कील शब्दांत टीका केली. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही. त्यांनी केलेल्या युद्धामुळे रस्त्यांसाठी लागणारे डांबर थेट दिल्लीवरून आणावे लागते. त्यामुळे अनेक रस्त्यांची कामे खोळंबली आहेत,” असा दावा त्यांनी केला.

नगर-मनमाड महामार्गाच्या कामालाही या परिस्थितीचा फटका बसल्याचे सांगत, “नगर-मनमाड रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे महामार्गाच्या कामावरून सुरू असलेल्या टीकेला विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले.

विकासकामांना विरोध करताना ठेकेदारांना मारहाण करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, ठेकेदार आणि नागरिकांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

Leave a Comment