संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील आराध्य दैवत बिरोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्ताने बिरोबारायांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच असंख्य भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली. “बिरोबाच्या नावानं चांगभलं”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
श्रावण महिना सुरू होताच साकूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या पर्वानिमित्त भाविकांनी बिरोबा महाराजांचे दर्शन घेत अभिषेक, पूजा तसेच विविध धार्मिक विधी केले. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
साकूरचे बिरोबा महाराज हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून, दरवर्षी श्रावण महिन्यात येथे मोठ्या उत्साहात यात्रोत्सव साजरा केला जातो. श्रावणातील विविध सण आणि धार्मिक पर्वांमुळे या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त होते. नागपंचमी तसेच नारळी पौर्णिमेच्या काळात येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. त्यामुळे संपूर्ण श्रावण महिनाभर साकूरमध्ये भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण राहणार आहे.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी यात्रा कमिटीच्या वतीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी भाविकांनी रांगेत उभे राहत शिस्तबद्ध पद्धतीने बिरोबारायांचे दर्शन घेतले.
दरम्यान, यात्रेनिमित्त साकूरमध्ये पाळणे, खेळणी, मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे लहान मुलांसह कुटुंबांसाठीही यात्रेचा उत्साह वाढला आहे. जागोजागी स्वयंसेवक यात्रेकरूंना सहकार्य करत आहेत.
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त बिरोबारायांच्या चरणी लीन झालेल्या भाविकांमुळे साकूर परिसराला जणू भक्तीचा साज चढला आहे. डफांचा निनाद, “बिरोबाच्या नावानं चांगभलं”चा जयघोष आणि भाविकांची मांदियाळी यामुळे संपूर्ण साकूर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
