मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. त्यातच फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चांवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट भाष्य केलं आहे. (Devendra Fadnavis)
PM मोदींची घेतली भेट
फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अपेक्षित असलेल्या मदतीबाबतही त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
उत्तन-विरार कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्प, नदीजोड प्रकल्प यांसह विविध विकासकामांची माहिती मोदींना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचीही भेट घेतली. पर्यावरण आणि वन विभागाच्या विविध प्रलंबित मंजुरींबाबत यावेळी चर्चा झाली.
पियूष गोयल, निर्मला सीतारमण यांच्यासोबतही बैठक
फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि निर्मला सीतारमण यांच्यासोबत उद्योगविषयक बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगितले. देशभरातील मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असून, औद्योगिक वसाहती आणि केंद्राच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा होणार आहे.
‘मी महाराष्ट्रातच आहे’; दिल्लीच्या चर्चांवर फडणवीसांचा टोला
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चेबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. मी दिल्लीत असलो तरी चर्चा, मुंबईत असलो तरी चर्चा. अनेक रिकामटेकडे लोकं आहेत. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे पतंग, फुगे उडवायचे ते उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. जनता आणि मोदींनी मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम?
फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे सध्या तरी केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चांना त्यांनी स्वतःच पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने दिल्लीच्या राजकारणापेक्षा राज्याच्या कारभारावरच आपले लक्ष असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.
