मुंबई : महायुती सरकारमध्ये गेल्या दीड वर्षापासून चर्चेचा आणि राजकीय तिढ्याचा विषय ठरलेल्या रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा अखेर निर्णय झाला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाकडून सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी याबाबत घोषणा करण्यात आली.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. दोन्ही पक्षांकडून आपल्या नेत्यासाठी दावा करण्यात आल्याने रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय दीर्घकाळ रखडला होता. अखेर या राजकीय संघर्षात भरत गोगावले यांनी बाजी मारली आहे.
विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट २०२६ रोजी रायगडमध्ये स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण भरत गोगावले यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी अधिकृत नियुक्ती झाली आहे.
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रिपदावरूनही महायुतीतील घटक पक्षांमध्ये चुरस होती. अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या नियुक्त्यांमुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या महायुतीतील राजकीय तिढ्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
