भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील पाच बड्या नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय संघटनेत मोठे फेरबदल करत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली ही नवी टीम काम करणार आहे. या फेरबदलात महाराष्ट्रातील पाच नेत्यांना महत्त्वाच्या राष्ट्रीय जबाबदाऱ्या देण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.

नव्या कार्यकारिणीत माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचीही राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय प्रीती गांधी यांना सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून संधी देण्यात आली आहे.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महामंत्री आणि १६ राष्ट्रीय सचिव नियुक्त करण्यात आले आहेत. संघटनात्मक पातळीवर अनुभवी नेत्यांसोबत नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्षाने आगामी राजकीय आव्हानांसाठी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रातील या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे आगामी काळात राज्यातील भाजपच्या संघटनात्मक आणि राजकीय भूमिकेलाही अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment