संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील कौठेमलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित असलेल्या जागेवर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला विरोध करण्यासाठी महायुतीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावर आमदार सत्यजित तांबे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘तुम्ही रडल्यासारखं करा, आम्ही मारल्यासारखं करतो,’ अशा शब्दांत तांबे यांनी या आंदोलनाची खिल्ली उडवत महायुतीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कौठेमलकापूर येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात असल्याचा आरोप करत महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी थोरात-तांबे यांच्या भूमिकेमुळे एमआयडीसीला अडथळा निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प आणला जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी महायुतीच्या आंदोलनावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. “सोलर प्लांट त्यांचाच, पाणी त्यांचंच, एमआयडीसी त्यांचीच आणि सरकारही त्यांचंच; मग एवढा अट्टाहास करण्याची गरज काय होती?” असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला.
तांबे पुढे म्हणाले, “जर सोलर प्लांट मी आणला असेल तर चांगली गोष्ट आहे. तिथे एमआयडीसी करायची असेल, तीही चांगली गोष्ट आहे. तालुक्यात जेवढी विकासाची कामे होतील, त्या सर्वांचे आम्ही स्वागतच करू.”
मात्र, एका प्रकल्पासाठी असलेली जागा दुसऱ्या प्रकल्पासाठी काढून घेण्याची पद्धत आपण कधीही अवलंबलेली नाही, असेही तांबे यांनी स्पष्ट केले. “एका प्रोजेक्टसाठी असलेली जागा आम्ही दुसऱ्या प्रोजेक्टसाठी काढून घेणे कधीही केलेले नाही,” असे त्यांनी सांगितले.
कौठेमलकापूर येथे एमआयडीसी आणण्याची भूमिका आपण पहिल्यापासूनच घेतली असल्याचे सांगताना तांबे यांनी या प्रकल्पासमोरील सर्वात मोठी अडचण पाण्याची असल्याचे स्पष्ट केले. “एमआयडीसी आम्हाला पहिल्यापासून आणायची होती. मात्र, पाण्याची सर्वात मोठी अडचण आहे. परंतु तोही प्रश्न आता मिटणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत सरकारचे धोरण स्पष्ट असल्याचे सांगत तांबे यांनी आंदोलनाच्या राजकारणावरही टीका केली. “सोलर झाला पाहिजे, हे सरकारचे धोरण आहे. परंतु राजकारणासाठी आंदोलन करायचे, पत्र द्यायचे, तिकडून फोन येणार आणि मग आंदोलन मिटणार, अशी दुरादुस्ती आम्ही करत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
“जे भांडण करायचे ते स्पष्टपणे करायचे. खोटे-नाटे भांडण करायचे नाही, हे आमचे स्पष्ट मत आहे,” असे म्हणत सत्यजित तांबे यांनी कौठेमलकापूरच्या सोलर प्रकल्पाच्या मुद्द्यावरून महायुतीवर थेट निशाणा साधला.
तांबे यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
