छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. “मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले असले तरी मराठा समाजाला आरक्षणाबाबत ठोस काहीही मिळालेले नाही.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे मराठा नेतृत्व पुढे आणणे आणि एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी जरांगे यांना राजकीय सुपारी मिळाली आहे. आरक्षणावर मराठा समाजाची सातत्याने फसवणूक झाली असून ‘हैदराबाद गॅझेट’नुसार आरक्षण मिळते हे जरांगे यांनी जाहीर सिद्ध करावे,” असं आव्हान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवसेनेचे नेते डॉ. संजय लाखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीचे उपोषण मनोज जरांगे यांनी पाटोदा येथे स्थगित केले. या उपोषणातून समाजाला काय मिळाले असा सवाल करीत शिवसेनेचे सचिव डॉ. संजय लाखे यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘कुणबी प्रमाणपत्र मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी सोडलेले उपोषण आता सामाजिक आंदोलन राहिले नसून त्यांनी राजकीय भूमिका जाहीरपणे स्वीकारली आहे. पाटोद्यात उपोषण सोडताना विखे यांना समजून घ्या, त्यांना प्रेम द्या. पण एकनाथ शिंदे यांना माफ करणार नाही, असे जरांगे म्हणाले. विखे यांचे नेतृत्व समोर आणण्यासाठी हा खटाटोप होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न समजून घेत माजी न्या. संदीप शिंदे समिती नेमून नोंदी शोधण्याचे सर्वात महत्त्वाचे काम केले. मराठवाड्यात समितीमुळे तीन लाख २५ हजार प्रमाणपत्रे मिळाली आणि ४७ हजार नोंदी सापडल्या आहेत. तसेच साडेपाच हजार अधिसंख्य पदे निर्माण करुन संधी हुकलेल्या मराठा पात्र तरुणांना शिंदे यांच्या प्रयत्नातून नोकरीत सामावून घेतले गेले. न्या. शुक्रे मागासवर्गीय आयोग स्थापन करुन समाजाला वैध मागास ठरवून आरक्षणास पात्र ठरविले’, असे लाखे म्हणाले.
उपोषणानंतर मराठ्यांना काय मिळाले, हे विखे आणि जरांगे यांनी सांगावे. संख्यात्मक नोंद असल्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार प्रत्येकाला जात प्रमाणपत्र मिळणार नाही. प्रमाणपत्र मिळाले तरी जातवैधता होणार नाही. वंशावळ जुळणे, शिंदे समितीने निश्चित केलेल्या ४२ पुराव्यांपैकी काही पुरावे असतील तरच प्रमाणपत्र मिळते. मग समाजाची फसवणूक का ?, असा सवाल लाखे यांनी केला. जातपडताळणी समित्या बरखास्त करा, हा विखे यांचा सल्ला बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका लाखे यांनी केली.
