जिल्हा बँक अध्यक्षपदावर सुजय विखेंची भूमिका स्पष्ट; म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असतानाच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्त्यांकडून अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव पुढे केले जात असले, तरी आपल्याला कोणतेही पद मिळवण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचे नाव सुचवतील, त्यांनाच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळेल, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी येथे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत त्यांची सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाली. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अरुण तनपुरे आणि युवा नेते हर्ष तनपुरे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. या भेटीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह अध्यक्षपदाबाबत भाष्य केले. अध्यक्षपदासाठी कार्यकर्ते आपले नाव पुढे करत असल्याबाबत विचारले असता त्यांनी मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली.

“माझ्या कार्यकर्त्यांना वाटतंय की मी अमेरिकेचा राष्ट्रपती झालं पाहिजे. पण त्यांच्या वाटण्यावर काही नसतं. ते त्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे. मला कुठेच काही व्हायचं नाही. मी अतिशय समाधानी माणूस आहे. जनतेने आजपर्यंत जी संधी आणि जो सन्मान दिला, तो मी स्वीकारला,” असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या चर्चेला वेगळे वळण मिळाले असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाचे नाव पुढे करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment