पावसाने पुन्हा वळण घेतलं! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत जोरदार सरींची शक्यता

मुंबई : राज्यातून मॉन्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली असतानाच, महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अनेक भागांत ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे.

हवामान विभागाने 6 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. सिंधुदुर्गातही पावसाची शक्यता असून, यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, पालघर, ठाणे आणि मुंबईत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागांत पावसाची शक्यता तुलनेने कमी आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे एकीकडे राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असताना दुसरीकडे काही भागांत पुन्हा पावसाच्या सरींची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी स्थानिक हवामानाच्या अंदाजानुसार खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment