जिल्हा बँक निवडणुक : बाळासाहेब थोरातांच्या निर्णयावरच सुजय विखे बिनविरोध होतील, कारण….

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी तब्बल 369 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. अखेरच्या दिवशी अनेक दिग्गजांनी मैदानात उतरत राजकीय समीकरणांना नवे वळण दिले.

सोमवारी अखेरच्या दिवशी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अक्षय कर्डिले, आमदार विवेक कोल्हे, बिपिन शंकरराव कोल्हे, माजी आमदार बबनराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, माजी मंत्री शंकरराव गडाख, सचिन जगताप आणि अमित भांगरे यांच्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

दरम्यान, राहाता तालुक्यातील सेवा सोसायटी मतदारसंघात सर्वाधिक लक्षवेधी राजकीय घडामोड घडली. या मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात एकनाथ चंद्रभान घोगरे आणि भास्कर निवृत्ती खर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे विखे यांच्या बिनविरोध निवडीच्या चर्चेला सध्या तरी ब्रेक लागला आहे.

एकनाथ घोगरे यांची उमेदवारी विशेष चर्चेत आली आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने प्रतिभा घोगरे यांना उमेदवारी दिली होती. प्रतिभा घोगरे यांचे पती एकनाथ घोगरे यांनी आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. घोगरे हे बाळासाहेब थोरात समर्थक म्हणून ओळखले जातात.

त्यामुळे राहाता मतदारसंघातील या लढतीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार असल्याची चर्चा आहे. थोरात यांनी निर्णय घेतल्यास सुजय विखे पाटील यांच्यासाठी बिनविरोध निवडीचा मार्ग पुन्हा मोकळा होऊ शकतो. त्यामुळे अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीच्या टप्प्यात कोण कोण माघार घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

369 अर्जांमुळे निवडणुकीचे चित्र रंगले असले तरी खरी राजकीय लढत माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment