संगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात गुरुवारी दुपारी इर्टिका कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने कर्नाटकातील २४ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील होन्नाली आणि नाईक कुटुंबातील सदस्य इर्टिका कारने (क्र. KA 29 B 8777) पुण्याहून नाशिकच्या दिशेने प्रवास करत होते. गुरुवारी दुपारी चंदनापुरी घाटात प्रवेश करताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार थेट रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर कार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड गटारात कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात अर्पिता भीमआप्पा नाईक (वय २४, रा. मुदलगी, जि. बेळगाव, कर्नाटक) या युवतीचा जागीच मृत्यू झाला. तर रोहन होन्नाली, अभिषेक नाईक, सुरज होन्नाली आणि बसय्या नेलुर हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब बांबळे आणि पोलीस कर्मचारी अजय आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत अर्पिता नाईक हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
