ब्रेकिंग! घारगाव पोलीस ठाण्याचे PI बाबासाहेब बोरसे यांची बदली ; संदिप वऱ्हाडे यांच्याकडे प्रभारी पदाचा कार्यभार

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) – अहिल्यानगर पोलीस दलात प्रशासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, संगमनेर उपविभागांतर्गत येणाऱ्या घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दगडू बोरसे यांची पोलीस नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथे तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत आदेश जारी केला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापना शाखेमार्फत काढण्यात आलेल्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची घारगाव पोलीस ठाण्यातून पोलीस नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथे पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, बोरसे यांची बदली झाल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार पोलीस निरीक्षक संदिप सुकदेव वऱ्हाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वऱ्हाडे हे सध्या अहिल्यानगर येथील टी.एम.सी. येथे नियुक्त आहेत. त्यांना पुढील आदेश होईपर्यंत घारगाव पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, पोलीस निरीक्षक वऱ्हाडे यांनी तात्काळ घारगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारून पोलीस निरीक्षक बोरसे यांना पोलीस नियंत्रण कक्षात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करावे आणि त्याबाबतचा अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या संदर्भित अहवालाच्या अनुषंगाने ही प्रशासकीय कार्यवाही करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. मात्र, संबंधित अहवालातील सविस्तर कारणे आदेशात स्पष्ट करण्यात आलेली नाहीत.

या आदेशामुळे घारगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी आता पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात आली आहे. पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या नियंत्रण कक्षातील नियुक्तीनंतर घारगाव पोलीस ठाण्याच्या कामकाजाची जबाबदारी नव्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे राहणार आहे.

Leave a Comment