ब्रेकिंग! अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात खासदार निलेश लंके यांची दमदार एंट्री! पारनेरमधून राहुल शिंदे यांचा पराभव

पारनेर (DSNews24) अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवात झाली असून, या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या पारनेर मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार राहुल शिंदे यांचा पराभव केला. या विजयामुळे खासदार निलेश लंके यांचा अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात अधिकृत प्रवेश झाला आहे.

जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यापूर्वी निवडणुकीतील २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित दहा जागांसाठी झालेल्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच पारनेर मतदारसंघाच्या निकालाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.

पारनेर सोसायटी मतदारसंघात खासदार निलेश लंके आणि भाजपचे राहुल शिंदे यांच्यात थेट लढत होती. राहुल शिंदे हे महसूलमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या लढतीला केवळ दोन उमेदवारांमधील निवडणूक न मानता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले होते. अखेर मतमोजणीनंतर खासदार निलेश लंके यांनी बाजी मारत राहुल शिंदे यांच्यावर विजय मिळवला.

या निकालामुळे जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणांच्या चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे. विशेषतः विखे गटाशी संबंधित मानल्या जाणाऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्याने या निकालाची जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रात चर्चा होत आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उर्वरित जागांचे निकालही टप्प्याटप्प्याने स्पष्ट होत असून, संपूर्ण निकालानंतर बँकेतील नव्या संचालक मंडळाचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. पारनेरमधील विजयामुळे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात आपली उपस्थिती नोंदवली आहे.

Leave a Comment