महाराष्ट्र हादरला…! स्टेट बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा, ३० कोटींचा मुद्देमाल लंपास

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भोकर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास बँकेत घुसलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँक कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच गोळीबार करून बँकेतील तब्बल ३० कोटी रुपये किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केल्याने काही आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेत दुपारी तीनच्या सुमारास काही सशस्त्र दरोडेखोर अचानक शिरले. त्यांच्याकडे बंदुका आणि इतर शस्त्रे होती. बँकेत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी शस्त्राचा धाक दाखवत धमकावले. यावेळी काही कर्मचाऱ्यांना मारहाणही करण्यात आली. दरोडेखोरांनी बँकेतील सोने आणि रोकड ताब्यात घेतली. प्रतिकार होऊ नये यासाठी त्यांनी बंदुकीतून गोळीबार केल्याचीही माहिती समोर आली आहे. अवघ्या काही मिनिटांत दरोडेखोरांनी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल लुटून घटनास्थळावरून पळ काढला.

ग्रामस्थांचा सिनेस्टाईल पाठलाग; आरोपींना पकडण्यात यश

दरोड्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनाही तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे आरोपींचा शोध सुरू केला. यावेळी विदगाव परिसरात एक आरोपी आढळून आल्याने ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. काही ठिकाणी आरोपींचा पाठलाग करून इतर संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान रोकड आणि बॅगा पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती आहे.

कोट्यवधींच्या मुद्देमालामुळे जिल्ह्यात खळबळ

या दरोड्यात तब्बल ३० कोटी रुपये किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे. भरदिवसा, तेही बँकेसारख्या सुरक्षित ठिकाणी सशस्त्र दरोडा पडल्याने बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दरोडा पडलेल्या बँकेच्या शाखेला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी घटनास्थळाची माहिती घेतली. दरम्यान, पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून दरोड्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.

फरार आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणात काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असले तरी दरोड्यात सहभागी असलेले आणखी काही जण फरार असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरोडेखोरांनी बँकेची रेकी केली होती का, त्यांना बँकेतील सोन्याच्या साठ्याची माहिती कोणी दिली, तसेच या गुन्ह्यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर बँकेत घुसून कोट्यवधींचे सोने लुटण्याच्या या घटनेने भोकर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना मदत झाली असून उर्वरित आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Comment