आळेफाटा पोलिसांच्या पेट्रोलिंगमध्ये दुचाकीचा बनावट नंबर उघड ; पारनेरचा १९ वर्षीय तरुण ताब्यात!

आळेफाटा : (DSNews24) पोलिसांच्या नियमित पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका दुचाकीस्वाराला थांबवून तपासणी केली असता दुचाकीच्या आरटीओ क्रमांक आणि चेसी क्रमांकामध्ये तफावत आढळून आली. अधिक तपास केला असता संबंधित दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पोखरी येथील १९ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आणे गावच्या हद्दीत एक तरुण मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव ओंकार भाऊसाहेब वाकळे (वय १९, व्यवसाय शेतीमजुरी, रा. पोखरी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.

त्याच्या ताब्यातील मोटारसायकलच्या मागील बाजूस एमएच १६ डीएन १५५५ हा क्रमांक लावलेला होता. पोलिसांनी या क्रमांकाची माहिती तपासली असता सदर दुचाकी ओंकार याचे वडील भाऊसाहेब एकनाथ वाकळे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी प्रत्यक्ष दुचाकीचा चेसी नंबर तपासला असता तो आरटीओ क्रमांकाशी जुळत नसल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर पोलिसांनी ओंकार वाकळे याच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने वडिलांच्या नावावर असलेली एमएच १६ डीएन १५५५ क्रमांकाची मोटारसायकल हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीचे कर्मचारी घेऊन गेले असल्याचे सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी दुचाकीच्या प्रत्यक्ष चेसी नंबरच्या आधारे अधिक माहिती घेतली असता संबंधित मोटारसायकलबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले.

त्यानंतर पोलिसांनी ओंकार भाऊसाहेब वाकळे याला पुढील तपासासाठी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. दुचाकीवरील नंबर आणि प्रत्यक्ष चेसी नंबर यामध्ये तफावत असल्याने पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीच्या दुचाकीचा प्रकार उघडकीस आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, राजू मोमीन, पोलीस शिपाई अक्षय नवले आणि अभिमन्यू मोटे यांचा समावेश होता.

Leave a Comment