संगमनेर (DSNews24/किरण पुरी) – संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर शिवारात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला रस्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ येत दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांनी ७० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) दुपारी घडली. निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे, फॉरेस्ट परिसरातील रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत वच्छलाबाई तबाजी ढेंबरे (वय ७०, रा. अंजनीगडवस्ती, बिरेवाडी, साकूर, ता. संगमनेर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, वच्छलाबाई ढेंबरे या पती तबाजी ढेंबरे यांच्यासोबत राहतात. शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) दुपारी सुमारे १२ वाजता त्या पतीसह इलेक्ट्रिक स्कुटीवरून खरशिंदे येथे मुलगी कमल संजय वाडेकर यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथे मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता त्या दुसऱ्या मुलीच्या चौधरवाडी, वरवंडी येथील घरी गेल्या. तेथे जेवण केल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघेही स्कुटीवरून साकूर येथील आपल्या घराकडे निघाले.
दरम्यान, कौठे मलकापूर गावच्या शिवारात फॉरेस्टजवळील निसर्ग हॉटेलच्या पाठीमागील रस्त्यावर असताना पाठीमागून एका मोटारसायकलवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी पती तबाजी ढेंबरे यांना हा रस्ता साकूरकडे जातो का, अशी विचारणा केली. त्यावर दाम्पत्याने होकार दिला. त्यानंतर मोटारसायकलवरील दोघे त्यांच्या स्कुटीजवळून पुढे जात असतानाच मागे बसलेल्या इसमाने अचानक वच्छलाबाई यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र जोरात हिसकावले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वच्छलाबाई यांनी चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत त्यांची स्कुटी खाली पडली. त्याचाच फायदा घेत दोन्ही चोरटे मंगळसूत्र घेऊन मोटारसायकलवरून साकूरच्या दिशेने पसार झाले. या घटनेत सुमारे ९० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरीस गेले आहे. त्यामध्ये दोन पळ्या, चार मोठे सोन्याचे मणी आणि काळ्या मण्यांमध्ये गुंफलेले सुमारे ८० लहान मणी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरट्यांचे वर्णन करताना फिर्यादीने दोघेही सडपातळ बांध्याचे असल्याचे सांगितले आहे. त्यापैकी मोटारसायकलवर मागे बसलेला इसम रंगाने गोरा असून त्याने काळ्या रंगाचे जर्किन घातले होते. घटनेनंतर वृद्ध दाम्पत्य घरी परतले आणि त्यांनी मुलगा अण्णासाहेब ढेंबरे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलाने आईला पोलीस ठाण्यात आणून तक्रार दाखल केली.
याप्रकरणी वच्छलाबाई ढेंबरे यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरुद्ध सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रस्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध दाम्पत्याला गाठून भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कौठे मलकापूर परिसरातील रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
