संगमनेर : शिक्षकाचे घर फोडले ; ४ लाखांचा ऐवज लंपास

संगमनेर : घर बंद करून शिक्षक कुटुंबासमवेत परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडून ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी (दि.८) सायंकाळी पाच ते शुक्रवारी (दि.९) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे घडली.

याप्रकरणी शिक्षक रोहीदास विष्णु घुले (वय-५३,रा. सारोळे पठार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिक्षक घुले हे कुटूंबासह पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे पाहुण्यांकडे गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी सायंकाळी पाच ते शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडत आत प्रवेश केला.

लोखंडी कपाट उचकटून मनीमंगळसुत्र, कर्णफुले, मिनीगंठन, सोन्याचे डोरले, जोडवे, चांदीच्या पट्ट्या यांसह एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पंचनामा केला. चोरीचा अधिक तपास सहाय्यक फौजदार राजू खेडकर हे करीत आहेत.

दरम्यान, पठारभागात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर घरफोड्या व किरकोळ चोऱ्यांचे प्रकार सुरु असून घारगाव पोलिसांना चोऱ्यांचे सत्र थांबवता येत नसल्याने पोलिसांच्या कृतीविषयी संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment