अहमदनगर जिल्ह्याला मिळाले सहा नवे पीआय

महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांनी राज्यातील पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांची बाहेरच्या जिल्ह्यात बदली झाली असून सहा पोलीस निरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत.

पोलिसांच्या बदलीसाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे मे महिन्यात होणार्‍या बदल्या जून महिन्यात झाल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी बदलीबाबत आदेश नुकतेच काढले आहेत.

यामध्ये नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले व अकोले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुभाष भोये यांची नाशिक शहर येथे बदली झाली आहे. जिल्हा जातपडताळणी समितीमध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सईदखाँ दादाखाँ पठाण यांची महामार्ग सुरक्षा पथकात बदली झाली आहे.

जिल्हा पोलीस दलातील चौघांना मागील महिन्यात पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. तसेच दोन पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त होती. त्या रिक्त जागेवर आता नवीन सहा पोलीस निरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत.

पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असणारे हरिष खेडकर यांची नगर जिल्हा पोलीस दलात बदली झाली आहे.

याशिवाय गुन्हे अन्वेषण विभागातून नितीनकुमार चव्हाण, लातूरवरून सोपान शिरसाठ, रायगडवरून प्रदीप देशमुख, कोल्हापूरवरून अशोक भवड, सोलापूर ग्रामीणवरून धनंजय जाधव हे निरीक्षक जिल्हा पोलीस दलात बदलून आले आहेत.

Leave a Comment